Wednesday, 23 December 2020

थकले रे नंदलाला

फक्त तीन कडवी. पण आयुष्याचा विचार करायला लावणारी. आधी मला वाटलं होतं की या कवितेबद्दल लिहिताना कवी बद्दलच्या माझ्या भावना आड नाही आणायच्या. पण ते केवळ अशक्य आहे. गदिमांच्या कवितां बरोबर मीच मला उमगत जाते. ह्या अश्या कवी बद्दलचे विचार कसे काय अडवणार? त्यांच्या प्रत्येक कवितेत जीवनाच्या वेगवेळ्या पैलूंचं दर्शन घडतं मला; निशब्द होते मी.  

त्यातून गदिमांची कविता आणि बाबूजींचं संगीत असेल तर केवळ स्वर्गसुख. ह्या दोघांचं संगम असलेल्या एका तरी गाण्याचं रोज वेड लागत मला. दिवसभरात काम करताना किंवा गाडी चालवताना ते गाणं ऐकत राहते मी. आणि मग विचार करून सरते शेवटी रात्री मला त्या गाण्यात दडलेला अजून एक अर्थ सापडतो. 

आजचा दिवस होता "थकले रे नंदलाला" ह्या गाण्याचा. गाणं एवढा अध्यात्मिक आहे कि अभंग वाटावा. आज पर्यंत असं वाटत होतं कि मीपण काढून टाकण्याची केलेली धडपड ही त्या गाण्यातून दिसते. पण आज अचानक जाणवलं. 

आध्यात्मिकतेचा विचार थोडा बाजूला ठेऊन बघितला आणि जाणवलं. हे गाणं म्हणजे चक्क depression चं प्रवासवर्णन आहे. 

हल्ली सुशांत सिंघ राजपूत प्रकरणामुळे नैराश्याबद्दल अनेक चर्चा चालू आहेत. त्यामुळे कदाचित हा विषय माझ्या डोक्यात आला असेल. पण पुन्हा ती कविता वाचल्यावर नैराश्याच्या वाटचालीचं वर्णन तिथे इतकं चपखल बसलं कि माझं मलाच आश्चर्य वाटलं. 

नाच नाचुनी अति मी दमले 

थकले रे नंदलाला 

ह्या ओळींवरून कवितेची दिशा लक्षात येते. चित्रपटातील (जगाच्या पाठीवर) गाणं बघितलं असल्यामुळे तो प्रसंग डोळ्यासमोर येतो. पण मग तो प्रसंग थोडा बाजुला ठेऊन विचार केला जातो. कवितेतील व्यक्ति केवळ शरीरानेच नाही, तर मनानं पण थकली आहे असा भास होतो. अर्थात हा भास आशाताईंच्या आवाजातली जादू पण असू शकतो. खरं तर ह्या अनंत अर्थांनी भरलेल्या ओली लिहिल्या आहेत. त्या ओळींना जिवंत केलाय बाबूजींच्या संगीतानी. आणि ओळीतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ उमलावलाय आशाताईंच्या आवाजानी. अशा त्रिवेणी संगमा मुळे हे गाणं अजरामर झालंय. असो... 

पहिल्या दोन ओळी आपल्याला कवीच्या मानसिक स्थितीची ओळख करून देतात. कवी का बरं थकला असेल? हा विचार आपल्या मनात येतो. 

निलाजरेपण, कटीस नेसले निसुगपणा चा शेला 

आत्मस्तुतीचे कुंडल कानी,  गर्व जडविला भाला 

उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला 

हे कडवं म्हणजे आपल्या स्वतःपुरतं जगण्याची पहिली पायरी आहे. आजूबाजूच्या जगाचा विचार ना करता प्रत्येक कार्य आपण निर्लज्जपणे, निसुगपणे करत राहतो. किंबहुना निर्लज्जपणाचे कवचाचा अंगावर ओढून घेतो. आणि हे कवचच अंगावर अगदी शेल्यासारखं मिरवतो. सतत आत्मस्तुती करून, म्हणजे सतत आपलाच कौतुक आपल्याच कानांनीं ऐकून एक प्रकारचे ते आपले कुंडल होऊन बसते. आणि आजूबाजूच्या जगाचा विचार न करता सतत सगळ्याचा उपभोग घेऊन ते माळेसारखे मिरवणं हेच आपला जीवन होऊन जातं.  ह्या कडव्यापासूनच कळत कि कवी स्वतः पुरता विचार करून जगत आहे, आणि या पद्धतीने जगण्यात आणि मिरवण्यात धन्यता मानत आहे. पण अश्या जगण्यामुळे पुढे काय होतं? 

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला

अनय अनीती नूपुर पायी, कुसंगती करताला 

लोभ प्रलोभन नाणी फेकी, मजवर आला गेला 

सततच्या स्वार्थी जगण्याने अतृप्ती जणू आयुष्याचा ताल धरू लागली आहे. ह्या अतृप्तीच्या तालावर नाचताना अन्यायाचे आणि अनीतीचे पायी पैंजण आलेत. अतृप्ती आली कि आपण बाहेर आधार शोधू लागतो. आणि स्वार्थी जीवनशैली मुळे आपल्याला आधार न मिळता कुसंगतीच हाती येते. लोभ मध्ये, प्रलोभनांमध्ये वाहावत जाऊन आपल्या आयुष्याची गाडी रुळांवरून कायमची निसटते. आपल्याला काय घडतंय ते कुठेतरी खोलवर जाणवलेलं असतं. आपल्याला मनोमन खात्री पटते कि ह्या दरीतून आपण बाहेर पडू शकणार नाही. आणि इथूनच खऱ्या नैराश्याची सुरुवात होते. 

(To be continued)

No comments: